Effects of Lockdown on Nature

Effects of Lockdown on Nature

या आर्टिकलमधील ठळक मुद्दे  

Key Points

पर्यावरणावर परिणाम करणारे घटक

निसर्गावर मानव हा कायम अत्याचार करत आलेला आहे. वाहतूक, उद्योग, वीज केंद्र, पर्यटन यांचा पर्यावरणावर परिणाम होत असतो. त्याचबरोबर औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि प्लास्टिक प्रदूषण वाढत आहे. जंगलतोड, नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी आणि वायू प्रदूषण वाढत असून पर्यावरणाचे फार मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. मानव निर्मित धातू व प्लास्टिक वस्तूंबद्दलचे आपले प्रेम पर्यावरणावर काय पणिाम करते याचा विचार आपण करत नाही. भारत सरकारने काही प्लॅस्टिक  वापरावर बंदी आनली त्यामुळे काही प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर कमी झाला असला तरी पूर्णपणे बंद झालेला नाही. त्यासाठी आपण सर्वांनी साथ देण्याची गरज आहे.

‘पर्यावरणावर होणारा मानवी परिणाम’ हा जगभरातील तज्ञांसाठी चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड सुधारणा, औषधांमध्ये सुधारणा यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शेती विकसीत होत असून उत्पन्नात वाढ होत आहे. या सर्व सकारात्मक गोष्टी घडत असतांना पर्यावरणावर मात्र त्यांचा विपरीत परिणाम होतांना दिसतो.

उर्जेसाठी कोळसा आणि जीवाश्म इंधनांवरील आपले अवलंबित्व ही आणखी एक समस्या आहे. लोकसंख्या जितकी जास्त असेल तितकी जास्त जीवाश्म इंधन वापरली जातील. जीवाश्म इंधन (जसे तेल आणि कोळसा) च्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड हवेत मिसळतो त्यामुळे हजारो प्रजाती नष्ट होण्याची भीती निर्माण होते.

मानवांना जागेची आवश्यकता असते आणि त्यापैकी बरीच जागा वसाहत, शेती आणि उद्योगांसाठी वापरली जाते. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम अधिक स्पष्टपणे होतो. परिणामी मोठ्या प्रमाणात इकोसिस्टम खराब होते. हवा फिल्टर करण्यासाठी पुरेसी झाडी नसल्यास, सीओ पातळी वाढते ज्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचे नुकसान होण्याची शक्यता असते.

(Back to the key points)


निसर्ग आणि मानव


आज संपूर्ण जग ' कोरोना' शी लढत आहे.  ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानव निर्मित याचा विचार करत बसण्याची ही वेळ नाही. तर आलेल्या संकटाला तोंड देत पुन: नव्याचे उभे राहण्याची वेळ आहे. निसर्गाच्या विरुद्ध गेल्यानंतर अनेक भयंकर परिणाम भोगावे लागतात हे जगाने आज अनुभवले आहे. तेंव्हा वेळोवेळी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन लढत बसायचे की निसर्गाशी जुळवून भौगोलिक, आर्थिक व सामाजिक विकास साधायचा. याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे.

निसर्गाला आपली गरज नाही, तर आपल्याला निसर्गाची गरज आहे. आपण आनंदी असलो तर निसर्ग आनंदी होत नाही. तर नैसर्गिक वातावरण पाहून आपण आनंदी होतो. तेंव्हा आपल्या आनंदासाठी नैसर्गिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी आपणच घेतली पाहिजे. नैसर्गिक वातावरणसाठी आपण काही करण्याची मुळीच गरज नाही. ही प्रक्रिया निसर्ग स्वत: करतो. आपण थोडी झाडे लावली की त्याचे फोटो काढत सर्वत्र आपल्या कार्याचा टेंभा मिरवतो. परंतू झाडे तोडतांना आपल्या कार्याचा, कतृत्वाचा विचार करत नाही. तेंव्हा विकासाचे नाव पुढे करत त्या आड दडण्याचा प्रयत्न करतो. विकास-विकास करत मोठया प्रमाणात वृक्षतोड करायची. त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करायचा आणि पुन्हा झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे. हा खटाटोप करुन निसर्गावर उपकार करण्यापेक्षा तो जसा आहे तसा राहू देण्याची कृपा करावी ही अपेक्षा मात्र निसर्ग निश्चितच करत असेल.

निसर्गामघ्ये मानवाने जर लुडबुड केली नाही तर झाडे लावण्याचा खटाटोप करण्याची गरज पडणार नाही. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन विकास करण्यापेक्षा निसर्गाशी जुळवून घेऊन विकास करण्याची वेळ आलेली आहे. निसर्गावर अतिक्रमण करुन विकास करण्यापेक्षा मानवाने केलेले अतिक्रमण हटवून विकास करणे केंव्हाही चांगले. पण तसे होत नाही कारण निसर्ग गप्प राहतो, आपले तसे नाही. परंतू गप्प राहून आपला झटका मात्र निसर्ग दाखविल्याशिवाय राहात नाही यासाठी त्सुनामीचे उदाहरण पुरेसे आहे.  

(Back to the key points)


लॉकडाऊन काळातील पर्यावरण


जगभर ‘COVID-19’ चा  प्रसार वेगाने वाढत असताना, संपूर्ण जगाने मानवी गतिशीलतेला निर्बंध घालण्यासाठी कर्फ्यू, लॉकडाऊन, विलगीकरण या मार्गांचा स्विकार केला. त्यामुळे सर्व प्रकारच्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि शहरीकरण क्रिया अचानक बंद झाल्या. लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग काही काळ थांबलेले होते. कारखाने, वायुगळती, विषारी पदार्थ  इतरत्र फेकणे बंद हाेते. दुषित पाणी नदयापर्यंत पाेहचत नव्हते. रस्त्यावरील वाहने, धुळीचे प्रदुषण, खाणकाम, जंगलतोड, प्राणी संग्रहालये, उदयाने, व्याघ्रप्रकल्प हे सर्व बंद होते. या सर्वामुळे आर्थिक विकास थांबला, परंतू  निसर्गाने मात्र मोकळा श्वास अनुभवला. लॉकडाऊनचा खरा फायदा निसर्गाला झाला. स्वच्छ हवा, स्वच्छ नद्या, कमी आवाज प्रदूषण, व्यवस्थित आणि शांत वन्यजीव यांच्या गुणवत्तेत सुधारणा झाली.

दररोज गाडयांच्या हॉर्नच्या कर्कष आवाजाने जागे होण्याची सवय लागलेल्या आम्हा लोकांना कित्येक दिवसानंतर पक्षांचा चिवचिवाट ऐकायला मिळाला. प्राणी, पक्षी मुक्तपणे संचार करतांना आढळले. रस्त्याच्या कडेला असणारी झाडी आपले काळे तोंड न दाखवता आनंदाने आपल्या मुळ रुपात डोलतांना दिसली. खरा निसर्ग अनुभवायला मिळाला. 

'कोरोना' ने मानवाचा श्वास रोखला, पण निसर्गाने मात्र मोकळा श्वास अनुभवला.  प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करताना आढळले. कदाचित त्यांनी केंव्हातरी विचार केलेला असेल 'अपना टाईम आयेगा' आता आपण विचार करण्याची गरज आहे की निसर्गावर असा विचार करण्याची वेळ येणार नाही याचा. निसर्गाने आपल्याला हा अनुभव दिला आहे. ही संधी दिली आहे की, आता तरी सुधरा, आर्थिक विकासाच्या नावाखाली  होणारी आमची होरपळ थांबवा.

आतापर्यंत प्राणी मानवाच्या संपर्कात यायला घाबरत होते पण, आता मानुस मानसाच्या संपर्कात यायला घाबरतो. निसर्गाच्या विरुध्द गेल्यास अशी संकट येत राहतील तेंव्हा निसर्गाशी जुळवून घेणे आणि विकास करणे हे आपल्या हिताचे आहे की नाही हे आपण ठरवायचे.

(Back to the key points)


वायू प्रदूषण

वायू प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होत असतात. उच्च रक्तदाब, न्यूमोनिया,  दमा, फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयविकाराचा झटका, संज्ञानात्मक आणि मानसिक आजार यासारख्या अनेक श्वसन रोगांवर वायू प्रदूषणाचा परिणाम होतो. फरक एवढाच आहे की हे रोग ‘COVID-19’ सारखे एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीमध्ये संक्रमित होत नाहीत.

लॉकडाऊनच्या काळात वायू प्रदूषणामध्ये अनपेक्षितपणे घसरण झाली. सर्व लोक घरात थांबल्यामुळे प्राणी व पक्षाना त्यांची आवश्यक असलेली जागा मिळत असल्याचे दिसले.

(Back to the key points)


ध्वनी प्रदूषण

ध्वनी प्रदूषण प्रमुख प्रदूषकांपैकी एक मानले जाते. ध्वनी हा अवांछित आवाज आहे. ज्यामुळे संवादामध्ये अडथळा निर्माण होतो. काही आवाज हे त्रासदायक, मन विचलित करणारे असतात. आवाज झोपेमध्ये अडथळा आणतात, लहान मुले, आजारी व्यक्ती व वृध्दांसाठी प्रचंड त्रासदायक असतात. अभ्यासातील एकाग्रता भंग करतात. सभोवतालच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी देशाच्या विविध भागात अनेक अभ्यास केले गेले आहेत. एकूण वातावरणाचा मोठा आवाज मोटर वाहनांमुळे होतो. लॉकडाऊन काळात ध्वनी प्रदूषणाची पातळी प्रचंड कमी झाल्याचे आढळले.

काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या काळात काही पक्षी आपले पंख पसरवतात आणि मानवाने व्यापलेल्या भागात त्यांचे प्रजनन करतात. स्थलांतरित पक्षी तलावांमध्ये आणि जलकुंभात अधिक प्रमाणात परत येतांना आढळले आहेत. या शांत वातावरणात पक्षी त्यांच्यात संवाद कसा साधतात हे पहायला मिळाले. पर्यटकांचा व वाहनांचा आवाज कमी झाल्यामुळे पक्ष्यांच्या गाण्याचा अधिक ठळक आवाजात ऐकू आला. आता स्थलांतरित पक्षी मानवी हस्तक्षेपाशिवाय मुक्तपणे उडू शकतात. लॉकडाऊन काळात सागरी पर्यटन बंद असल्यामुळे सागरी पर्यावरणातील ध्वनी प्रदूषण कमी झाले. मासेमारी बंद असल्यामुळे मासे आता किना-यावरही आढळतात.

(Back to the key points)


जल प्रदूषण

गेल्या काही दशकांत शहरीकरण प्रचंड वाढले आहे. द्योगिकीकरण, शहरे आणि खेड्यांमधून नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाण्याचे प्रमाण वाढत आहे. भूमी वापराचे पॅटर्न बदलल्याने गंगा आणि यमुना नद्यांबरोबर देशातील इतर अनेक नद्यांची पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे आढळले होते.

भारत सरकारतर्फे नमामि गंगे प्रकल्प, स्वच्छ गंगा मिशन फॉर नॅशनल मिशन अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. गंगा नदीच्या  पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

लॉहडाऊन काळात गंगा नदी आणि यमुना नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. लॉकडाऊन मध्ये उद्योग बंद झाले होते आणि या नद्यांमध्ये सोडण्यात आलेले बहुतेक औद्योगिक नालेही बंद पडले होते. उद्योग बंद पडल्यामुळे भारतातील प्रमुख नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे.

कोरोनाच्या या संकटावर मानव मात केल्याशिवाय राहणार नाही, झालेली आर्थिक तूट भरुन काढल्याशिवाय राहनार नाही. हे सर्व कराच पण, निसर्गाला धोका न पोहचवता, यातच मानव जातीचे कल्याण आहे.

(Back to the key points)


निष्कर्ष

एकंदरीत ओझोन थर, वायू, जल व ध्वनी प्रदूषणावर विविध प्रकारच्या उत्सर्जनासह जागतिक वातावरणावरील लॉकडाऊनचा परिणाम दिसून आला आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना स्वच्छ हवा मिळाल्यामुळे लोकांमध्ये हवा, पाणी आणि चांगल्या वातावरणाबद्दल आशावादाची भावना निर्माण झाली.

पर्यावरणीय जाणकारांना असे वाटते की कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. पर्यावरणावर होणारा हा सकारात्मक प्रभाव तात्पुरता असू शकतो. विषाणूचा धोका कमी झाल्यानंतर, जनजीवन पुन: सुरळीत सुरु होईल. काही दिवस किंवा आठवड्यांनंतर कार्बन उत्सर्गाच्या पूर्व पातळीवर जाऊ शकेल. पर्यावरणीय प्रदूषण अधिक वेगाने वाढेल. तेंव्हा दीर्घकालीन प्रदूषण कसे कमी करावे या दृष्टीकोनातून शासन आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत. 

या आर्टिकल विषयिच्या आपल्या सूचना व प्रतिक्रिया जरुर कळवा. धन्यवाद…….!

(Back to the key points)