लोकशाही म्हणजे काय? (What is democracy?)
“प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती
निवडणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य म्हणजे
लोकशाही होय.” ‘बहुमतांचे राज्य’ असेही लोकशाहीचे वर्णन केले जाते.
लोकशाही हा शब्द कसा तयार झाला ? (How did the word democracy come about ?)
लोकशाही हा डिमॉक्रसी (Democracy) या इंग्रजी संज्ञेचा मराठी
प्रतिशब्द आहे. त्याची इंग्रजी व्युत्पत्तिकोशात डिमॉस (Demos) म्हणजे लोक + क्रसी
(Cracy) म्हणजे नियम अशी फोड केली असून त्यांचा अनुक्रमे ‘सामान्य लोक’ व ‘सत्ता’
असा अर्थ दिला आहे. हा शब्द डिमॉस + क्रॅटोस (Demos + Kratos) या ग्रीक शब्दापासून
झालेला असून त्याचे लॅटिन रुप डिमॉक्रॅशिया असे आढळते. तेव्हा काही ग्रीक शहर-राज्यांमध्ये
अस्तित्त्वात असलेल्या राजकीय व्यवस्थांचा अर्थ दर्शविला जात असे.
अब्राहम लिंकन यांची ‘लोकशाही’ या संकल्पनेची व्याख्या (Abraham Lincoln's definition of 'Democracy')
‘लोकशाही’ या संज्ञेचा स्पष्ट अर्थ आणि संकल्पनेची काटेकोर
व्याख्या, हे अद्यापही विद्वानांत विवाद्य विषय आहेत. अनेक आधुनिक विचारवंतांनी
‘लोकशाही’ या संकल्पनेची व्याख्या व फोड केलेली आहे. त्यापैकी अब्राहम लिंकन यांची
‘लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य’ ही व्याख्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध
आहे. लिंकन या संदर्भात पुढे म्हणतात, ‘मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही,
तद्वतच मालक म्हणून राहण्यास आवडणार नाही. माझ्या या उद्गारातूनच लोकशाहीची
कल्पना व्यक्त होते.
लोकशाहीचे प्रकार (Types of Democracy)
लोकशाहीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही
असे दोन प्रमुख प्रकार सामान्यतः मानले जातात. आधुनिक काळात ‘लोकशाही’ हा
शब्दप्रयोग सामान्यपणे अप्रत्यक्ष लोकशाही किंवा प्रातिनिधिक लोकशाही या अर्थानेच
केला जातो. तथापि स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोव देशांतून आजही पत्यक्ष लोकशाहीचा
प्रयोग काही प्रमाणात पाहावयास मिळतो.
स्वित्झर्लंडमध्ये वर्षातून काही दिवस सर्व नागरिक एकत्र
जमतात. यावेळी सर्वच विधेयके चर्चेसाठी जनतेपुढे ठेवण्यात येतात आणि बहुमताने
निर्णय घेतात. ही पद्धत ऑस्ट्रेलियाच्या संविधानातही नमूद केलेली आहे परंतु तिचा
प्रमुख्याने उपयोग संविधान दुरुस्तीच्या संदर्भातच करण्यात येतो.
प्रातिनिधिक
लोकशाहीचे संसदीय व अध्यक्षीय लोकशाही असे सांप्रत कार्यवाहीत असलेले दोन प्रमुख प्रकार
आढळतात. संसदीय लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळ आणि संसद परस्परांवर अवलंबून असतात आणि मंत्रिमंडळ
हे संसदेला जबाबदार असते. बहुमतातील पक्षाचा नेता हा पंतप्रधान असतो. भारतासह ग्रेट
ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलियात ही पद्धत रुढ आहे. अध्यक्षीय शासनपद्धतीत मंत्रिमंडळ संसदेपासून
अलिप्त असतं आणि अध्यक्षाची जनतेकडून सरळ निवड होते. ही पद्धत प्रामुख्याने अमेरिकेत
आढळते. थोड्याफार फरकाने फ्रान्स, श्रीलंका इ. देशांतूनही ती प्रचारात आहे.
समाज, संस्कृती व लोकशाही (Society, Culture and Democracy)
लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे. तो एक राज्यघटनेचा व
राज्यव्यवस्थेचा प्रकार आहे. सामाजिक जीवनाच्या आवश्यकतेतून, अपरिहार्यतेतून जीवन
व्यतीत करण्याच्या ज्या काही विचारप्रणाल्या आणि आचारधर्म प्रसृत झाले, त्यांपैकी
लोकशाही ही एक आहे म्हणून समाज आणि संस्कृती यांना उद्देशून लोकशाही या शब्दाचा
वापर करणे अर्थपूर्ण ठरते. समाज व संस्कृती यांचे वळण जर लोकशाहीपर नसेल, तर लोकशाही
पद्धतीचे संविधान स्वीकारुनही त्या देशात लोकशाही रुजणे व टिकणे अवघड जाते. याउलट,
एखाद्या देशात लोकशाही पद्धतीने दीर्घकाळ राज्यकारभार चालू असता, त्या देशातील
समाजाला व संस्कृतीला लोकशाही वळण प्राप्त होते. अशा प्रकारे या दोन्हींमधील
परस्परसंबंध स्पष्ट करता येतो.
लोकशाही तत्त्वविचार व कार्यपद्धती- Democratic principles and procedures
शासनव्यवहारात लोकांचा सहभाग, हे लोकशाहीचे प्रमुख लक्षण आहे.
मूलतः व अंतिमतः सत्ता लोकांच्या ठायी वास करते, या तत्त्वाचा आविष्कार मताधिकारात
होत असतो. मानवी समाजाच्या स्वरुपाविषयी रुसोने सामाजिक कराराचा सिद्धांत मांडला.
त्याच्या मते सर्वजन संकल्प ही सर्वांमध्ये सारखीच बसत असलेली पण अमूर्त अशी एक
प्रेरणा आहे. राज्य ही त्या इच्छेने उभी केलेली यंत्रणा असून तिची सर्व कार्य
पद्धती सर्वजन संकल्पावर अवलंबून असते.
रुसोने प्रत्येक नागररिकाचा राज्यकारभारात सहभागी होण्याचा
हक्क व जनतेच्या सार्वभौम अधिकाराचा पुरस्कार केला. त्याच्या या विचारांनी लोक
भारले. राज्यसंस्था हा एक करार आहे, ही कल्पना रुसोपूर्वी टॉमस हॉब्ज आणि जॉन लॉक
ह्या दोन तत्त्ववेत्यांनी विस्ताराने मांडली आहे. हॉब्जच्या मांडणीप्रमाणे
राज्यसत्तेला अनियंत्रित अधिकार मिळत होते, तर लॉकच्या विचारप्रणालीत राज्यसत्तेवर
काही अल्पस्वल्प बंधने येत.
लोकशाहीतील निर्णय (Decisions in a democracy)
स्वतंत्र व समान व्यक्तींना आत्मविकास साधण्यासाठी सर्वांत
अनुरुप अशी व्यवस्था म्हणजे लोकशाही शासनव्यवस्था होय. ती एक अस्थितादर्शवादी
(यूटोपियन) जीवन संस्कृती आणि राज्यविषयक सिद्धांतप्रणाली आहे. लोकशाहीत सर्व
निर्णय बहुमताने घेतले जावेत, हा सामान्य संकेत आहे परंतु अल्पमतात असणाऱ्यांची
योग्य ती दखल घेतली जाते किंवा नाही, त्यांचा सहभागाचा अधिकार अबाधित राहतो किंवा
काय, हे पाहिले जावे. व्यवहारात अल्पमतवाल्यांना त्यांची मते मांडण्यास, त्यांचा
पुरस्कार पूर्ण वाव व उत्तेजन दिले जावे. बहुमताने निर्णय घेताना त्यांच्या वास्तव
मागण्यांचा आदर करण्यात यावा.
लोकशाहीचे प्रधान तत्त्व (The main principle of democracy)
लोकशाहीतील ‘लोक’ या शब्दात सामान्यतः सर्व प्रौढ नागरिकांचा
समावेश होतो. वंश, जात, धर्म, भाषा, लिंग, आर्थिक उत्पन्न वा मालमत्ता, व्यवसाय इ.
गोष्टींवरुन भेदाभेद न करता, विवक्षित सर्व प्रौढ व्यक्तींना (अठरा वर्षांवरील)
नागरिकत्वाचे आणि मतदानाचे समान हक्क बहाल करणे, हे लोकशाहीतील प्रधान तत्त्व
मानले गेले आहे. लोकसहभागाचा प्राथमिक व पायाभूत आधार, असे या हक्कांचे स्थान आहे.
नागरिकाचा पूर्ण सहभाग असण्यासाठी त्याला मूलभूत हक्क आणि नागरी स्वातंत्र्ये
मिळाली पाहिजेत, या भूमिकेतून देशाच्या लिखित संविधानातच त्यांचा अंतर्भाव केलेला
असतो.
आणीबाणीसारख्या एखाद्या विशेष प्रसंगी काही काळ लोकांच्या
हक्कांवर निर्बंध लादण्यात येतात किंवा त्यांचा संकोच होतो. या मताधिकाराचा वापर
करुन स्थानिक ते राष्ट्रीय पातळींवरील बहुविध निवडणुकांत नागरिक मतदान करुन मत
व्यक्त करतात आणि प्रतिनिधी निवडतात. हा लोकांचा अपेक्षित न्यूनतम सहभाग म्हणता
येईल. हा सहभाग न्यूनतम असला, तरी लोकशाही प्रक्रियेत त्यास विशेष महत्त्व आहे
कारण लोकशाहीत नियतकालिक निवडणुका ही आवश्यक बाब असून लोकशाहीच्या अभिवृद्धीसाठी
वा सुदृढ बांधणीसाठी मुक्त व दबावरहित वातावरणात निवडणुका होणे, हे अत्यंत गरजेचे
असते.
लोकशाहीचे अनिवार्य घटक (Essential elements of democracy)
बहुमताच्या आधारे सार्वजनिक निर्णय घेणे, त्याकरिता निवडणुका
मुक्त आणि दडपणविरहित वातावरणात होणे, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, नागरी
स्वातंत्र्य व विचारांचे मुक्त आदान-प्रदान, लोकाभिमुख प्रशासन, स्वतंत्र व
निःपक्षपाती न्यायमंडळ इ. लोकशाही शासनाचे अनिवार्य घटक म्हणून सांगता येतात.
भारतातील लोकशाही शासनपद्धती (Democratic governance in India)
भारतातील लोकशाही शासनपद्धती ही जगातील लोकसंख्येने सर्वांत
मोठी असलेली लोकशाही आहे. लोकशाही मूल्यांवर श्रद्धा व दुसऱ्याच्या मतांविषयीचा
आदर, हा लोकशाहीचा गाभा येथे आढळतो. आपल्या विचारांच्या विरुद्ध असलेल्या
मतांविषयी केवळ सहिष्णुताच न दाखविता त्या विचारांचा मान राखला जातो, यावर
भारताच्या लोकशाहीची यशस्विता अवलंबून आहे. वैचारिक संघर्ष सहजतेने स्वीकारणे, हीच
भारतीय लोकशाहीची खरी शक्ती आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीची सुमारे पंचवीस वर्षे एकाच
पक्षाचा साचेबंदपणा, अशिक्षित मतदार आणि बहुपक्षीयांचे अस्थैर्य यांवर भारतीय
लोकशाही हिंदोळे घेत होती. आता निवडणूक पद्धतीतही काही सुधारणा होऊ घातल्या आहेत.
गोस्वामी समितीने सुचविलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने काही शिफारशींचा विचार झाला,
तर पुढील निवडणुकांत लोकशाहीची प्रक्रिया अधिक विशुद्ध स्वरुपात पाहावयास मिळेल,
असा राजकीय विचारवंत विश्वास व्यक्त करतात.
निष्कर्ष (Conclusion)
या लेखात आपण लोकशाही म्हणजे काय? लोकशाही हा शब्द कसा तयार
झाला? अब्राहम लिंकन यांची ‘लोकशाही’ या संकल्पनेची व्याख्या या विषयी सविस्तर
माहिती पाहिलेली आहे. त्याचबरोबर लोकशाहीचे प्रकार, समाज, संस्कृती व लोकशाही, लोकशाही तत्त्वविचार व कार्यपद्धती, लोकशाहीतील निर्णय प्रक्रिया या सर्व माहितीचा
आढावा घेतलेला आहे. तसेच लोकशाहीचे प्रधान तत्त्व, लोकशाहीचे अनिवार्य घटक आणि
भारतातील लोकशाही शासनपद्धती अशा अनेक मुदयांवर माहिती दिलेली आहे.
एकंदरित लोकशाही देशांमध्ये विसाव्या शतकाच्या अखेरीस होत
असलेल्या राजकीय घडामोडींमुळे लोकशाही हे एक मूल्य म्हणून अधिक सुप्रतिष्ठित झाले
आहे. मात्र त्याबरोबरच आर्थिक विषमता आणि शोषण यांचे निरसन लोकशाही पद्धतीने कसे
करता येईल , या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसते. तसेच प्रभुत्वशाली औद्योगिक
संघटना आणि नोकरशाही या यंत्रणांचे लोकशाहीकरण करण्याचा प्रश्नही अद्याप
अनुत्तरितच आहे. त्यामुळे तात्विक दृष्ट्या आकर्षक अशी शासनपद्धती व्यवहारातही
अर्थपूर्ण आणि समूहकल्याणप्रद बनविणे, हे आव्हान लोकशाहीच्या समर्थक
पुरस्कर्त्यांपुढे उभे राहतेच.
धन्यवाद….!