निरोगी आरोग्यासाठी चांगल्या सवयी
सवय म्हणजे काय? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्यक्तींकडून कळत, नकळत घडल्या जाणा-या क्रिया किंवा एखादी कृती वारंवार करणे. उदा. पँट खाली सरकत नसतांनाही ती वारंवार वरती ओढणे, मानेला झटका देऊन केस वरती घेणे, गरज नसतांनाही नाकाला सतत हात लावणे, सतत खोटे बोलणे, कुठेही थुंकणे, बोलतांना विशिष्ट शब्द सतत वापरणे, अधूनमधून एक डोळा झाकणे किंवा दोन्ही डोळयांच्या पापण्यांची वेगात उघड झाक करणे, स्वच्छता न पाळणे, कामावर नेहमी उशिरा जाणे, वेळेचे बंधन न पाळणे, सतत दुस-याचा अपमान करणे, चांगल्या कामात नेहमी अडथळा आणने, जेवताना तोंडाचा आवाज करणे, चहा पितांना जोरात फुरका मारणे, कारण नसतांनाही दुस-याशी भांडणे, दुस-यांमध्ये भांडणे लावणे, चहाडी करणे, इ. त्या व्यक्तीची क्रिया चांगली असेल तर त्याला चांगली सवय आहे असे म्हटले जाते आणि जर वाईट क्रिया असेल तर त्याला वाईट सवय आहे असे म्हटले जाते. अर्थात हे ठरवण्याचा मापदंड प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. चांगले किंवा वाईट हे ठरवणे व्यक्तीपरत्वे बदलते.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या सवयी असतातच. मग त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील पण सवयी मात्र प्रत्येकाला असतात. चांगल्या सवयींची सुरुवात बालपणापासून झाली तर त्यांचा आयुष्यभर चांगला परिणाम दिसून येतो. वाईट सवयी शिकवाव्या लागत नाहीत, तर त्या न कळत मुले शिकतात. बालपणात लागणा-या वाईट सवयींकडे जर पालकांनी दुर्लक्ष केले तर त्या सवयी बदलणे कठीण जाते. कालांतराने त्याचे वाईट परिणाम देखील भोगावे लागतात.
प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करतात. त्यांना चांगल्या शाळेत घालतात, एक चांगले, अधिक समृद्ध जीवन मिळविण्यासाठी विद्यार्थी शाळेत शिक्षण घेण्यासाठी जातात. तथापि, खरोखर यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक चांगल्या सवयी मुले घरी आणि वर्गाच्या बाहेरच शिकतात. मुले अनुकरणप्रिय असल्यामुळे घरातील व्यक्ती, शेजारी, घरी येणा-या व्यक्ती, मित्र, यांचाही त्यांच्यावर परिणाम होत असतो. चांगल्या सवयी अंगिकारल्यास सर्व वयोगटातील व्यक्तींना यशस्वी होण्यास मदत होते. आपल्याला आयुष्यात यश मिळवायचे असेल तर चांगल्या सवयी असणे आवश्यक आहे. [हे ही वाचा २०० वाईट सवयी]
आपण विद्यार्थी, पालक, कामगार, उद्योजक, गृहिणी किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल तरीही जीवनात अधिक यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी उपयोगी पडतात. प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतात. जीवन आनंदाने आणि समाधानाने जगण्यास मदत होते. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात एक दिनचर्या ठरविणे आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
चांगल्या सवयी कोणत्या?
वेळेचे योग्य नियोजन करणे, सकाळी लवकर उठणे, आपले काम वेळेवर करणे, दूस-यावर अवलंबून न राहणे, नियमित व्यायाम करणे, मेहनत करणे, चांगला, निरोगी व पौष्टिक आहार घेणे, आपल्या शरीराला निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगल्या व निरोगी आहाराची गरज असते. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र जेवणाचा आनंद घेणे, मोठ्या व्यक्तींचा आदर करणे, इतरांना मदत करणे, इतरांबदल कृतज्ञता दाखवणे, नेहमी खरे बोलणे, अभ्यासाची सवय लावणे, कधीही हार न माणने, अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने प्रयत्न करणे, स्वतःचे काम स्वतः करणे, आई वडिलांचा आदर करणे, आई वडिलांना त्यांच्या कामात मदत करणे, आपले गृहकार्य नियमित करणे, पाणी काळजीपूर्वक वापरणे, गरज नसल्यास पाण्याचा नळ, घरातील दिवे, पंखे बंद करणे, घर आणि परिसर साफ ठेवणे, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, नियमित वाचण करणे, वक्तशीरपणा, सामाजिक कार्यात सहभागी होणे, वेळोवेळी हात धुणे, इ
या काही चांगल्या सवयी आहेत. यांचा अंगिकार केल्यास आपल्याला आपल्या कामात यश तर मिळेलच पण त्याबरोबर आपण इतरांसाठी चांगला आदर्श निर्माण करु शकतो. अशा व्यक्तीला समाजामध्ये मान-सन्मान मिळतो, समाज त्यांचा आदर करतो.
सवयीचा परिणाम काय होतो? याचे एक उदाहरण.
मयूरला दररोज झोपेतून उशिरा उठण्याची सवय होती. त्यामुळे त्याला आपली स्कूल बस पकडण्यासाठी उशिर व्हायचा. इतर मुले वेळेत बसस्टॉपवर येत असत व रांगेत उभे राहात असत. मयूर उशिरा यायचा व रांगेत उभे न राहता इतरांच्या पुढे जाऊन बसमध्ये घुसायचा. एके दिवशी मयूरच्याच शाळेतील विकी नावाच्या एका मुलाने त्याला रांगेत उभे राहण्याची व रांग न मोडण्याची सूचना दिली. परंतू त्याचा मयूरवर काहिही परिणाम झाला नाही.
नंतर त्या मार्गावरुन जाणा-या सर्व मुलांनी असा निर्णय घेतला की मयूरला मध्येच रांगेत घुसू दयायचे नाही. बस आल्याबरोबर मयूरही बस स्टॉपवर आला व इतर मुलांना बाजूला सारुन तो बसमध्ये चढला. ती मुले त्याला घबरली व ती त्याला तसे न करण्याबाबत विरोध करु शकली नाहीत. त्यावेळी विकीने त्याला विचारले की तू बसस्टॉपवर लवकर का येत नाहीस? त्यावर मयूर म्हणाला की मी रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहतो त्यामुळे मला उठायला उशिर होतो. विकी म्हणाला, उशिरा येऊन रांगेत उभे न राहता इतरांच्या पुढे जाऊन बसमध्ये घुसणे यात आपली चूक आहे असे तुला वाटत नाही का? मयूर म्हणाला ते मला समजतय, पण मी काय करु, मला उशिरा जाग येते. त्यामुळे बस पकडायला उशिर होतो.
विकीने विचारले तुझे आई वडिल तुला लवकर उठवत नाहीत का? मयूर म्हणाला मी त्यांना तसे करु देत नाही. विकी म्हणाला म्हणजे तुझे आई वडिल तुझे उशिरा उठण्याचे समर्थन करतात, अरे हे चांगले नाही. आपल्या एका चूकिचा परिणाम इतरांनी का सहन करायचा? कोणतिही सवय जर वेळीच सुधारली नाही तर त्याचे परिणाम वाईट होतात. तुझी ही सवय तुला एक दिवस नक्कीच महागात पडेल. मयूर म्हणाला मला शिकवू नकोस, माझ मी पाहून घेईल.
प्राथमिक शिक्षण संपवून जवळ जवळ २०-२२ वर्षे लोटली, मयूरची उशिरा उठण्याची व बसमध्ये घुसण्याची सवय कायम होती. एके दिवशी सार्वजनिक बसमध्ये काही लोकांनी मयूच्या या कृत्याला कंटाळून त्याला बसमधून बाहेर फेकले. मयूर स्वतःला सावरत, धडपडत उठण्याचा प्रयत्न करत असतांना त्याच्या समोर विकी आला व त्याला पाहून म्हणाला की तू अजून तशीच रांग मोडतोस? तुला माझे शब्द आठवतात का? त्यावर लज्जित होऊन मयूर म्हणाला मला माझी चूक समजली व त्याचा परिणामही मी भोगला, आता यापुढे रांग मोडणार नाही.
यावरुन आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण वाईट सवयींचे समर्थन करु नये. अन्यथा वाईट सवय तिचे परिणाम दाखवल्याशिवाय राहात नाही.
तेंव्हा पालकांनी आपल्या मुलांच्या सवयीकडे लक्ष ठेवले पाहिजे, त्यांच्या सवयीचे समर्थन न करता त्यांना त्यापासून दूर करण्याचा योग्य वेळी प्रयत्न केला तर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. मुलांना असे तयार करा की, त्याच्या विरोधकाला त्याचे पाय खेचण्या ऐवजी त्याचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. आपली सावली निर्माण करायची असेल तर उन झेलण्याची तयारी असावी लागते. चांगल्या सवयीमुळे प्रसंगी त्रासही होतो परंतू परिणाम मात्र चांगलेच असतात. मुलांना आपल्या समस्यांचा सामना करण्यास शिकवा. चांगल्या गोष्टी कधीही सोप्या नसतात परंतु हार मानणे आपले अपयश दर्शवते.
प्रभावीपणे अभ्यास करणे हे एक कौशल्य आहे. संपूर्ण आयुष्य जगणारे लोक आजीवन शिकणारे असतात. ते कधीही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे थांबवत नाहीत. एखाद्याला प्रभावी आणि कार्यक्षम पद्धतीने नवीन ज्ञान अभ्यासण्याची आणि गोळा करण्याची सवय असते. यशस्वी होण्यासाठी कसा अभ्यास करावा आणि ज्ञान कसे मिळवावे हे शिकणे केवळ नैसर्गिकरित्या होत नाही. हे शिकविणे आवश्यक आहे. अभ्यासाचे कौशल्य किंवा आपल्या अभ्यासाच्या सवयी सुधारण्याच्या सूचना इतरांना सांगा.
कोणत्याही प्रकारच्या यशाचा आनंद लुटण्यासाठी आयुष्यात चिकाटीची आवश्यकता असते. चिकाटी ही एक सवय आहे, ती असल्यास यश निश्चित मिळते. यशाबरोबर अपयश पचवण्याची क्षमता आपल्या मुलांमध्ये निर्माण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मुलांनी पैसे कमविणे, वाचवणे, बजेट, ट्रॅक करणे आणि हुशारीने पैसे खर्च करणे शिकले पाहिजे. प्रत्येक कार्य करताना सर्वोत्तम प्रयत्न करण्याची सवय आपण विकसित केली पाहिजे.
खोटे बोलणे हे त्यावेळच्या परिस्थितीमध्ये केवळ गुंतागंत निर्माण करते, सत्य हे एकदिवस बाहेर येत असते. एखादी गोष्ट कठीण असतानाही सत्य सांगण्याची सवय लावणे जास्त चांगले. मोबाईलमध्ये सतत गेम खेळून शारिरिक व मानसिक त्रास करुन घेण्यापेक्षा काहीतरी वाचणे हे केंव्हाही चांगले. एक चांगला वाचक असणे हे एक कौशल्य आहे. वाचनाचे असंख्य फायदे आहेत, त्यामुळे शब्दसंग्रह वाढतो, कल्पनाशक्ती विकशीत होते, सर्जनशीलता जागृत होते आणि वेळही चांगला जातो.
मला आशा आहे की आपण माझ्या शब्दांकडे लक्ष द्याल कारण मला माहित आहे की आपण प्रयत्न केल्यास आणि अडचणींना सामोरे गेल्यास काहीही करण्याची क्षमता आपल्यात आहे. बाकी तुमच्यावर अवलंबून आहे. [हे ही वाचा २०० वाईट सवयी]